चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा आवळून खून केला. आज पहाटे पुणे जिल्ह्यातील चिंचवड भागात ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ती असलेल्या आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचे नाव नकुल भोईर असे आहे. पोलिसांनी त्याची २८ वर्षीय पत्नी चैताली नकुल भोईर हिला ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या माहितीनुसार, नकुल भोईर आपली पत्नी चैताली हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. या कारणावरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. आज पहाटे पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वादाच्या भरात संतापलेल्या चैतालीने घरातील कपड्याने पतीचा गळा आवळून खून केला. घटनेच्या वेळी दोघांची दोन आणि पाच वर्षांची मुलं घराच्या आत झोपलेली होती. त्यावेळी बाहेरच्या खोलीत ही संपूर्ण घटना घडली.
नकुल आणि चैताली दोघे मिळून साडी सेंटर चालवत होते. चैतालीला भविष्यात नगरसेविका व्हायचे होते. ती समाजसेवेमध्येही सक्रिय होती. मात्र पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून तिने त्याचा जीव घेतला, ही गोष्ट अनेकांना हादरवून टाकणारी ठरली आहे.
घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पत्नी चैताली भोईर हिला ताब्यात घेतले. “ही घटना आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. महिलेने कपड्याने गळा आवळून पतीचा खून केला. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोसावी यांनी दिली.किरकोळ वादातून तरुणाचा खून
दुसरीकडे, स्थानिक विधी महाविद्यालयासमोरील परिसरात किरकोळ वादातून २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विधी महाविद्यालयासमोरील परिसरात गुरुवारी एक मृतदेह सापडला होता. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुण हा दुर्गापूरमधील बेताल चौकातील रहिवासी नितेश वासुदेव ठाकरे (२७) असल्याचे स्पष्ट झाले.
