राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटीकडून ‘आवडेल तिथे प्रवास’ अशी योजना असून याबाबत एसटीने महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेतील 4 आणि 7 दिवसांच्या पासचे तिकीट दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात राज्याच्या कोणत्याही भागात प्रवास करताना प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेत साध्या एसटी बस, शिवशाहीसह आता इलेक्ट्रिक बसमधील प्रवासाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी दरात वातानुकुलित बसमधून प्रवास करता येईल.
‘आवडेल तिथे प्रवास’ ही योजना एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 4 आणि 7 दिवस पास काढून नागरिक राज्याच्या कोणत्या ही भागात ST मधून फिरू शकतात. या योजनेमुळे प्रवास करताना प्रवाशांच्या पैशाची बचत होत होती. त्यामुळेच या योजनेला प्रवाशांकडून मोठा चांगला प्रतिसाद होता. पण, गेल्या काही महिन्यात एसटी महामंडळाने या योजनेच्या पासचे तिकीट दर वाढवले होते. पासचे दर वाढवल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच, एसटीच्या काही अटी आणि नियमांमुळे प्रवासात अडचणी येत होत्या. या योजनेतील पास काढल्यानंतर इतर गाड्यांतून प्रवास करता येत नव्हता.
