आरेच्या जंगलात नातवाने सोडलेल्या कॅन्सरग्रस्त आजीवर काळाचा घाला, नातवाला आशीर्वाद देत अखेरचा श्वास

काळ्याकुट्ट रात्री कॅन्सरग्रस्त वयोवृद्ध आजीला तिच्या नातवाने आरेच्या जंगलामध्ये सोडून दिलं, हिंमत बांधून आजीने तग धरला, अखेर पोलिसांनी तिला महापालिकेच्या रुग्णालयात नेलं, कृतघ्न वागणूक दिल्याबद्दल पोलिसांनी नातू आणि त्याच्या मित्राची कानउघडणीही केली. त्या घटनेला आता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला. मात्र त्वचेच्या कॅन्सरशी निकराने लढा देत असताना अखेर ही ६८ वर्षीय वृद्धा जगाचा निरोप घेऊन निघून गेली. अखेरच्या क्षणीही कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देऊन गेली. आजीच्या काळजातली माया पाहून उत्तनमधील आश्रमातील सर्वांचेही मन हेलावले.

यशोदा गायकवाड या ६८ वर्षीय आजीला त्यांच्या ३३ वर्षीय नातवाने तिघा मित्रांच्या मदतीने २१ जूनच्या रात्री आरेच्या जंगलात आणून सोडले होते. रात्रभर देवाचा धावा करत मदतीच्या प्रतीक्षेत त्या तिथेच पडून राहिल्या. अखेर पोलिसांनी त्यांना उचलून रुग्णालयामध्ये नेले.

तेव्हा त्या रात्रीच्या आठवणींनीही त्या थरथरत होत्या. आपल्या आयुष्याचा कष्टमय प्रवास त्यांनी त्यावेळी उलगडून सांगितला. पाटीपुस्तकामधील अक्षरे गिरवली नसली, तरी दुनियेच्या अनुभवशाळेतले शहाणपण त्यांच्याकडे होते. आयुष्यातल्या अनेक छोट्यामोठ्या लढाया त्यांनी हिंमतीने लढल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *