पुण्याचे प्रसिद्ध येवले अमृततुल्य अडचणीत; ती एक चूक महागात पडणार? मालकावर गुन्हा दाखल

महाराष्ट्रात मागील काही वर्षांत चहामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला बँड म्हणजे येवले अमृततुल्य. उत्तम चवीसह मोठमोठ्या दुकानांमुळे चहाचा हा ब्रँड राज्यात चांगलाच गाजला. मात्र ही कंपनी आता अडचणीत आली आहे. अनेक जुन्या चित्रपटांचे स्वामित्व हक्क असलेल्या शेमारू एंटरटेन्मेंट कंपनीच्या तक्रारीवरून सोमवारी येवले अमृततुल्य कंपनी आणि कंपनीच्या संचालकांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संचालकांनी कंपनीच्या व स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून परवानगी न घेता एका चित्रपटातील क्लिप प्रसारित केल्याचा आरोप शेमारू कंपनीकडून तक्रारीत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनेक जुन्या चित्रपटांचे स्वामित्व हक्क असलेल्या शेमारू कंपनीने मागील आठवड्यात केलेल्या दोन तक्रारींनंतर काल सोमवारी आणखी तीन तक्रारी केल्या आहेत. शेमारू कंपनीकडे ‘गोलमाल’, ‘फिर हेराफेरी’ यासह अनेक चित्रपटांचे स्वामित्व हक्क आहेत. असं असताना येवले कंपनीने परवानगी न घेता या चित्रपटांमधील काही प्रसंग घेऊन ‘मिम’ तयार केले व आपल्या ब्रँडच्या व्यावसायिक फायद्यासाठी समाजमाध्यमांवर पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेमारू कंपनीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर शेमारूने येवले कंपनीला जानेवारी महिन्यात नोटीस पाठवून संबंधित चित्रपटांचे स्वामित्व हक्क आपल्याकडे असून मिम तातडीने हटवा, असं सूचित केलं होतं. परंतु तरीही येवले कंपनीने मिम हटवले नाहीत. त्यामुळे आमचं 50 लाख रुपयांचे नुकसान झालं, असा दावा शेमारू कंपनीने तक्रारीत केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *