पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पवर जोरदार हल्ला चढवत ‘ राबवलं होतं. संपूर्ण जगभरातून भारताच्या या शौर्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. मात्र पुण्यातील एका महिलेने या ऑपरेशन सिंदूरची खिल्ली उडवणारा एक व्हाट्सअप स्टेटस ठेवला होता. पेशाने शिक्षिका असणाऱ्या फराह दिबा या महिलेने जळत्या तिरंग्याचे व्हाट्सअप स्टेटस ठेवून ‘ऑपरेशन सिंदूर’ची खिल्ली उडवली होती. या संदर्भात तिच्यावर पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काळेपडळ पोलीस स्टेशन वर या महिलेच्या विरोधात 7 मे रोजी BNS 152,196,197, 352, 353 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर नंतर पुण्यातील मोहम्मद वाडी भागातील मारगोसा हाईट्स या सोसायटीमधील नागरीक सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर चर्चा करत असताना फराह दिबा या महिलेने हसण्याचा इमोजी पोस्ट केला होता. इतकंच नाही तर तिने तिच्या व्हाट्सअप वर अनेक देश विरोधी आक्षेपार्ह स्टेटस सुद्धा ठेवले होते. त्यानंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. सोसायटीतील नागरिकांनी या महिलेवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून धरणे आंदोलन सुद्धा केले होते. त्यानंतर काळेपडळ पोलिसांनी फराह दिबा याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्यावरील संबंधित गुन्हे रद्द व्हावेत यासाठी फराह दिबा हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने फराह हिची याचिका फेटाळली आहे. राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होणारे संदेश हलक्यात घेऊन चालणार नाही. असं उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना म्हटल आहे. न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होती.
