अनेक ठिकाणी मुलांसाठी किंवा पालकांसाठी वेगवेगळ्या योजना सरकारकडून आणल्या जातात. ज्यामध्ये या योजनांसाठी स्वत: सरकार पैसे देत असते. कारण आपल्या देशातील किंवा राज्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी. सध्या अशीच एक योजना एका देशाने आणली आहे. काय आहे ती योजना पाहूयात.
चीन सरकारने घटत्या जन्मदरावर उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. देशातील लोकांना अधिक मूलं होण्यासाठी प्रोत्साहन देताना सरकार दिसत आहे. आता 3 वर्षांखालील प्रत्येक बाळासाठी दरवर्षी सुमारे 50 हजार रुपये चीन सरकार देणार आहे. या नव्या योजनेंतर्गत चीन सरकार सुमारे 2 कोटी कुटुंबांना थेट आर्थिक मदत देणार असून 2025 पासून ही योजना देशभरात लागू केली जाणार आहे.
महागाईमुळे मुलांचे प्रमाण कमी
चीनमध्ये महागाई आणि मूलं जन्माला घालण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. यामुळे देशात जन्मदर सतत घटत चालला आहे. सरकारचा विश्वास आहे की, ही आर्थिक मदत लोकांना मूलं वाढवण्यासाठी मदतीची ठरेल. 2022 ते 2024 मध्ये जन्मलेल्या मुलांच्या पालकांनाही लाभ मिळणार आहे. ज्या पालकांनी 2022 ते 2024 दरम्यान मुलं जन्माला घातली आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या राष्ट्रीय योजनेमुळे आधीपासून स्थानिक पातळीवर राबवल्या जाणाऱ्या योजना आता अधिक प्रभावी ठरणार आहेत. स्थानिक सरकारकडून या आधीच अशा काही योजनाची सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये होहोट शहरात तीन मुलं असलेल्या कुटुंबांना प्रत्येक बाळासाठी 1 लाख रुपये देण्याची योजना आहे.तर शेनयांग शहरात तीन वर्षांखालील तिसऱ्या बाळासाठी दरमहा सुमारे 7 हजार रुपये दिले जात आहेत.
तीन मुलांवर 1.5 लाख रुपयांपर्यंत लाभ
चीनच्या या नवीन स्कीमनुसार जर एखाद्या जोडप्याला तीन मुलं असतील तर त्यांना एकूण सुमारे 1.5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. चीनमधील एका अभ्यासानुसार, एका मुलाचा जन्मापासून 17 वर्षांपर्यंतचा खर्च सुमारे 60 लाख रुपये इतका होतो. हाच वाढत्या खर्चाचा धोका लक्षात घेऊन सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच सरकारकडून लोकांना मूलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
