पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या पाच जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश असून, न्यायालयाने पाचही आरोपींना दोन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सुनील सीताराम भोसले (वय ५१, रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (वय ५०,), गणेश बाबू पवार (वय ३५), शालूबाई प्रकाश काळे (वय ४५, तिघे रा. डिकमाळ, तुळजापूर, धाराशिव) व मंगल हरफुल काळे (वय १९, रा. खडकी रेल्वे लाइन वसाहत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कात्रज येथील वंडरसिटी परिसरातील वसाहतीत राहणाऱ्या कामगाराने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तीन आरोपी सराईत गुन्हेगार आरोपी शंकर उजन्या पवार पुणे रेल्वे स्थानकात भीक मागून उदरनिर्वाह करतो. त्याच्यासह आरोपी सुनील भोसले व गणेश पवार यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत, असे तपास अधिकारी सहायक निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
