‘उत्तन-विरार’ सी लिंकला हिरवा कंदील, पण सागरी सेतूसाठी 27 सूचना, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात ५२ हजार झाडे लावणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) उत्तन-विरार सागरी सेतूला सीआरझेडसंबंधीची महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) ही मंजुरी देताना खारफुटी, वन्यजीव, सागरी जीवांच्या रक्षणासह विविध प्रकारच्या २७ सूचना एमएमआरडीएला दिल्या आहेत.

मूळ ‘वर्सोवा-विरार’ असा सागरी सेतू नव्या आरेखनासह ‘उत्तन-विरार’, असा बांधला जाणार आहे. तीन जोडरस्त्यांसह समुद्रावरील मुख्य सेतू हा २४.३५ किमी लांबीचा असेल. त्याचा किनारपट्टी, वनसंपत्ती, खारफुटीसह सागरी वन्यजीव व काही मच्छिमारांवर परिणाम होणार आहे. या सर्वांचा ऊहापोह एमसीझेडएमएने ही मंजुरी देताना केला आहे. प्राधिकरणाच्या ११ ते १४ जुलैदरम्यान झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.

‘एमसीझेडएमए’ने एकूण १३ पैलूंचा अभ्यास केला. त्यामध्ये चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगने प्रकल्पाचा उपग्रहाआधारे केलेला अभ्यास मांडण्यात आला. राष्ट्रीय अधिस्वीकृती संस्थेकडून मान्यताप्राप्त कंपनीने केलेला पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास, संरेखनातील बदलानंतरचे विश्लेषण, किनारपट्टी, भरती, प्रवाळांवर होणारा परिणाम, खारफुटीवरील परिणाम व त्या बदल्यातील वनीकरण, मासेमारीवर होणारा परिणाम आदी या पैलूंचा त्यात समावेश होता.

हा सेतू समुद्रात २९ मीटर खोलपर्यंत पाइलिंगद्वारे (खोलवरील खोदकाम) उभारला जाणार आहे. त्यामुळे त्याचा सागरी जीवांवर थेट परिणाम होणार नाही. समुद्राच्या पृष्ठभागावरील भरतीवरही फार परिणाम होणार नाही. खोदकामावेळी सरासरी १०५ डेसिबलचा आवाज होऊ शकतो. त्याचा प्रभाव काही काळ, तोही २०० मीटरच्या त्रिज्येतच असेल. समुद्रातील गाळावरील फार परिणाम नसेल. काही प्रमाणात खारफुटीला फटका बसेल. त्यासंबंधी योग्य ती मंजुरी मिळविण्याची सूचना ‘एमसीझेडएमए’ने ‘एमएमआरडीए’ला दिली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी या प्रकल्पाची केंद्रीय वने व पर्यावरणाकडे शिफारस करण्यात आली आहे.

५२ हजार झाडे लावणार

या प्रकल्पात सर्व प्रकारची नऊ हजार ७५ झाडे प्रभावित होत आहेत. त्यातील एक हजार ८६८ झाडे कापली जाणार असून एक हजार ६१२ झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. पाच हजार ५९५ झाडांचे जतन होणार आहे. या सर्वांच्या बदल्यात एमएमआरडीए ५२ हजार झाडे लावणार असल्याचे बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आले आहे.

खारफुटीच्या ८,४२० झाडांचा समावेश

या प्रकल्पात उत्तन जोडरस्त्यासाठी ८.७१ हेक्टर व विरार जोडरस्त्यासाठी ६.६८ हेक्टर खारफुटीला फटका बसणार आहे. त्यामध्ये एकूण आठ हजार ४२० झाडांची कापणी करावी लागणार आहे. त्याच्या पाचपट अधिक तत्सम झाडांचे वनीकरण करण्याची सूचना ‘एमसीझेडएमए’ ने एमएमआरडीएला दिली आहे. त्याचवेळी या प्रकल्पाचा ५.२० हेक्टर भाग तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात आहे. त्यातील २.५० हेक्टर क्षेत्र हे राखीव जंगलाचा भाग असून, त्यातील १.६७ हेक्टर झाडांची या प्रकल्पासाठी कायमस्वरूपी कापणी होणार आहे, असे ‘एमसीझेडएमए’ च्या बैठकीत सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *