29 वर्षीय डॉक्टर मंदार उमेश दाभाडे यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. दाभाडेंनी चनई रोड भागातील संत रोहिदास नगर येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या घरात गळफास घेतल्याची घटना ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास समोर आली होती. महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आयुष्याची अखेर केल्याची माहिती समोर आली आहे.
भावाला पासवर्ड पाठवला
डॉ मंदार दाभाडे आपल्या घराचे दार उघडत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला होता. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने दार उघडण्यात आल्यावर सर्वांना मोठा धक्का बसला. या प्रकरणाचा उलगडा अतिशय फिल्मी पद्धतीने झाला. कारण मृत्यूपूर्वी डॉक्टर दाभाडे यांनी आपल्या भावाच्या मोबाईलवर पाठवलेल्या एका पासवर्डमुळे या प्रकरणातील धक्कादायक वास्तव उघड झालं.
महिलेच्या त्रासाला कंटाळून जीव दिला
एका महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी जीव दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मंदार यांनी जीव देण्यापूर्वी भाऊ लौकिक दाभाडे यांना त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड पाठवला असल्याचा खुलासा करण्यात आला होता.
सॉरी पप्पा व भैया
मयत डॉ मंदार दाभाडे यांचे अंत्यविधी आटोपल्यानंतर लौकिक यांनी तो पासवर्ड वापरुन मंदार यांचा मोबाईल उघडला असता, त्यामध्ये एक धक्कादायक सुसाईड नोट आढळून आली. त्यात मंदार यांनी ‘सॉरी पप्पा व भैया’ असे म्हणत आपल्या वडिलांची आणि भावाची माफी मागितली. स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन केले आहे.
