जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहराच्या मध्यवस्तीत रविवारी सकाळी बिबट्याने आढळल्याने अनेकांची पाचावर धारण बसली. शासकीय विश्रामगृह परिसरात आलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून डार्ट मारण्यात आले. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जमावाने जखमी बिबट्यावर काठीने अमानुष तडाखे दिल्याने संताप व्यक्त होत आहे. आमदार पाटील यांच्यासह जमावाच्या हातात लाकडी दांडके होते. यात बिबट्या गंभीर जखमी झाला.
शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास बिबट्या आढळल्याचे समजताच बघ्यांची गर्दी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुक्ताईनगर पोलिस आणि वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य पाहून स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने विश्रामगृह गाठले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारले.
डार्टमुळे बिबट्याला ग्लानी आली. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी हातात काठी घेऊन बिबट्यावर काठीचे तडाखे दिले. त्यांच्यासह जमावाने बिबट्यावर काठीचे तडाखे देण्यात आले. जखमी बिबट्यावर अमानुष छळ केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
