पाऊस भरपूर, पण नळ कोरडेच! टँकरने पाणी विकत घ्यावं लागल्याने नागरिक संतप्त

एकीकडे चांगला पाऊस होत असताना कल्याणमधील अनेक मोठी गृहसंकुले आजही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. जलवाहिनीच्या कामासाठी निधी कोणाचा? या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने सोसायट्यांना पाणीपुरवठा होत नसून, नागरिकांनी यावरून संताप व्यक्त केला आहे.

कल्याण पूर्वेतील देशमुख होम्स, अनंत रिजन्सी, रचना पार्क यासारख्या मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये नागरिकांनी लाखो रुपये खर्चुन घरे खरेदी केली आहे मात्र या सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्याने दररोज या सोसायट्याना टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. कधीतरी काही क्षणांसाठी येणाऱ्या पाण्यावर जगायचे कसे? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर भरल्यानंतरही महिन्याला लाखो रुपये पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागत असल्याने खर्चाचा मोठा भर पडत असल्याचे सोसायट्यांचे म्हणणे आहे.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील रचना पार्क, लक्ष्मी निवास, न्यू रचना पार्क ओम गुण गोपाल यासारख्या सोसायट्यांना मागील दोन वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून अनेकदा जलवाहिन्या कोरड्याच राहत असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे केली आहे. आंदोलने, मोर्चे काढूनही पाण्याची समस्या सुटत नसल्याने नागरिक त्रासले आहेत. या सोसायट्यांमध्ये जवळपास १०० हून अधिक इमारती असून या इमारतींमधील रहिवाशांना पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकत आणाव्या लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *