लग्नासाठी आणलेला लेहंगा आवडला नाही, म्हणून वधू तो परत करण्यासाठी गेली. परंतु दुकानदाराने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तिच्या ‘होणाऱ्या नवऱ्याने’ दुकानातच राडा घातला. दुकानामध्ये चाकू काढून तरुणाने लेहंगा कचाकचा फाडला. कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे परत न केल्यास लेहंग्याप्रमाणे फाडून टाकण्याची धमकी तरुणाने दुकानदाराला दिली.
काय आहे प्रकरण?
मेघना माखिजा नावाच्या तरुणीने 17 जून रोजी 32 हजार 300 रुपये किमतीचा लेहंगा खरेदी केला होता. मात्र विकत घेऊन घरी गेल्यानंतर तिला लेहंगा तितकासा छान वाटला नाही. त्यामुळे तिने तो परत करण्याचा निर्णय घेतला. तिने त्याच दिवशी दुकानदाराला फोन केला. दुकानदाराने पैसे परत देण्यास नकार दिला. त्याऐवजी, तिने क्रेडिट नोट घ्यावी आणि त्याऐवजी दुसरी वस्तू खरेदी करावी, असे त्याने सांगितले.
