11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 12 दोषींची निर्दोष सुटका केली आहे. यापैकी एकाचा या कालावधीत मृत्यू झाला आहे, तर 11 जणांची मुक्तता होणार आहे. माटुंगा रोड, माहीम जंक्शन, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते.
सुमारे 19 वर्षांपूर्वी, म्हणजेच 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सात ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील पाच दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आणि सात दोषींच्या जन्मठेपेच्या शिक्षेच्या विरोधातील अपिलांवर बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिला. न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाकडून निकालाचे वाचन करण्यात आले. दोषींना अमरावती, नागपूर आणि पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते.
