रेल्वेमार्गावर मृत्युसापळा; साडेसात वर्षांत मध्य रेल्वेवर लोकलमधून पडून 2709 प्रवासी मृत्युमुखी

मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेसेवेत गेल्या साडेसात वर्षांमध्ये लोकलमधून पडून दोन हजार ७०९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे; तर रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रकारांमध्ये तब्बल पाच हजार ५६४ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची विदारक वस्तुस्थिती आहे. मध्य रेल्वेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रकार रोखण्यासाठी उपाय योजले असल्याचा दावाही मध्य रेल्वेने त्यात केला आहे.

लोकल मृत्यूंच्या प्रश्नावर यतीन जाधव यांनी अॅड. सुरभी प्रभूदेसाई यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. त्यातच ९ जून रोजी मुंब्रा येथे धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूची घटना याचिकाकर्त्याने अर्जाद्वारे निदर्शनास आणली. त्यामुळे यापूर्वी ज्या दोन समित्या नेमल्या आहेत, त्यांच्या शिफारशींप्रमाणे कोणते उपाय आणि कधीपर्यंत अंमलात आणले जाणार, याची माहिती प्रतिज्ञापत्रावर देण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दिले होते. त्यानुसार, मध्य रेल्वेचे वरिष्ठ दिवाणी वाणिज्य प्रवींद्र वंजानी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात ही आकडेवारी देण्यात आली आहे.

‘मध्य रेल्वेने यापूर्वीच २०२१मध्ये ‘झिरो डेथ’ धोरणांतर्गत अतिरिक्त महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली आहे. या समितीच्या आत्तापर्यंत १२ बैठका झाल्या आहेत. प्रामुख्याने रूळ ओलांडताना व लोकलमधून पडून मृत्यू होत असल्याचे समितीच्या लक्षात आले. त्यामुळे त्याविषयी उपाय सुरू केले आहेत’, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अनेकदा लोकलच्या डब्यांच्या प्रवेशद्वारावरील खांबावरील पकड सैल होऊन प्रवासी खाली पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पकड घट्ट व्हावी, यादृष्टीने पृष्ठभाग खरबरीत करण्याचे काम सर्व उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये पूर्ण केले आहे आणि दरवाजाजवळ अतिरिक्त हँडलही बसवण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. तसेच शीव व कुर्ला स्थानक दरम्यान आणि मुलुंड व ठाणे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वे रूळांच्या सद्यस्थितीत बदल केला असून तीन ठिकाणी सिग्नलच्या खांबांची जागा बदलली आहे. शिवाय गर्दी टळावी यादृष्टीने सुमारे आठशे आस्थापनांना पत्र लिहून कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याची विनंतीही केली असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *