जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील रघुनाथ खैरनार हे आजोबा दोन दिवसांपासून बेपत्ता झाले होते. अशातच त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु ते सापडले नाहीत. त्याचवेळी पाळधी गावात असणाऱ्या रेल्वे ट्रॅक जवळ एक अनोळखी मृतदेह आढळतो. त्यावेळी स्थानिक रेल्वे गार्ड व इतर व्यक्तींकडून खैरनार कुटुंबाशी संपर्क केला जातो. खैरनार कुटुंब घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवतात.
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी पाठवतात. हे सुरु असतानाच इकडे गावात रघुनाथ खैरनार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जाते. त्यांचा मृत्यू झाल्याचे सर्व नातेवाईकांना कळवण्यात येते. पाळधी गावात त्यांच्या अंत्यासंस्कारासाठी नातेवाईक जमलेले असतात आणि त्याच वेळी रघुनाथ खैरनार हे चक्क पायी चालत आपल्या घरी येताना दिसतात. हे दृश्य पाहून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना एकच धक्का बसतो.
