शिरपूर तालुक्यातील आढे शिवारात खरीप हंगामासाठी शेतात मशागत करत असलेल्या एका शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना दि. १३ जून २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. नथ्थू हार्दिक सनेर (वय ६०), रा. ताजपुरी, असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते आढे शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतात खरीप हंगामासाठी बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करत होते.
शेतीकाम सुरू असतानाच त्यांनी औत थांबवत ते बाजूच्या बांधावर विश्रांतीसाठी बसले आणि हंड्यातील पाणी पिण्यासाठी झुकले, तेव्हाच अचानक आकाशात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्या दरम्यान जोरदार वीज त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत नथ्थू सनेर यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना घडताच आजूबाजूचे शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्वरित माहिती मिळताच थाळनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला.
या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. नथ्थू सनेर हे मेहनती आणि शांत स्वभावाचे शेतकरी होते. त्यांच्या अचानक जाण्याने ताजपुरी आणि परिसरातील लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून वादळी पावसाचा इशारा दिला जात असतानाही शेतकरी शेतीच्या कामात व्यग्र आहेत. परंतु विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असल्यास शेतकरी बांधवांनी सावध राहणे, सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे, आणि आकाशात वीज चमकत असल्यास पाणीपिण्यासाठी झुकणे टाळणे, अशा खबरदारीच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
