राजगड किल्ल्यातील अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून सुमारे 400 फूट खाली कोसळल्यामुळे पुण्यातील 21 वर्षीय पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे दाम्पत्य राजगडावर फिरायला आले असताना ही दुर्घटना घडली. कोमल शिंदे (वय 21 वर्ष, रा. आळंदी, पुणे) असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. गुरुवार 5 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेल्हे पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मकं काय घडलं?
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोमल शिंदे आणि तिचे पती गुरुवारी दुपारी राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. दुपारी पडलेल्या पावसामुळे किल्ल्याच्या पायवाटा निसरड्या झाल्या होत्या. सायंकाळी कोमल बालेकिल्ल्याच्या खडतर वाटेवरून खाली कोसळली. ती संजीवनी आणि सुवेळा माचीच्या पायथ्याशी पडली. खडकावर आपटल्याने तिच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली, आणि जोरदार रक्तस्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
