एकीकडे अवघ्या महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची वानवा असताना सोलापुरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. टेंभुर्णीजवळ फुटलेल्या पाईपलाईनमुळे अक्षरशः लाखो लीटर पाणी वाया गेलं. पाईपलाईन फुटून पाण्याचा 20 ते 30 फूट उंच फवारा उडत होता.
उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. उजनी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा असल्याने जिल्ह्यातील सर्वच शहरांत मोठी पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यातच आता भरीस भर म्हणजे पाईपलाईन फुटल्यामुळे सोलापुरकरांच्या समस्येत आणखीनच वाढ झाली आहे.
सोलापूर महापालिकेकडून फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात दिरंगाई होत असल्यामुळे प्रति सेकंद 700 लीटर पाणी वाया गेलं. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सोलापूरकरांना डोळ्यांदेखत पाणी फुकट गेल्याचं पाहून दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.

