मुंबईच्या चेंबूर परिसरात मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी विद्यार्थ्यांच्या दुर्देवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने खबरदारीचे उपाय तातडीने हाती घेतले आहेत. ठाण्यातही झाड कोसळून पादचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पादचारी जखमी झाला आहे. या दोन्ही घटनांची गंभीर दखल महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतली. त्यांनी बुधवारी दालनात वृक्षप्राधिकरण विभागाची बैठक घेऊन शहरातील धोकादायक झाडांचे सर्वंकष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. धोकादायक, वाळलेली अथवा कललेली झाडे व मोठ्या फांद्या तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून हटवाव्यात, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.
ठाणे शहरातील शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, प्रमुख रहदारीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरातील झाडांची विशेष तपासणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे, त्या ठिकाणीही पुन्हा सर्वेक्षण करून झाडांची स्थिती सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करण्याचे निर्देश महापौर पिंपळोलकर यांनी दिले.
महापौरांचे महत्त्वाचे आदेश
यावेळी रस्त्यांच्या कडेला छाटणी करून ठेवलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने उचलण्याचे आदेशही महापौरांनी दिले. पावसाळ्यात अशा फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी फांद्या पडून राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वागळे इस्टेटमध्ये महाकाय वृक्ष कोसळून पादचारी जखमी
पावसाने जोर पकडून आठवडा उलटत नाही तोच ठाण्यात दररोज वृक्ष आणि फांद्या कोसळून वाहनांच्या नुकसानीचे प्रकार समोर आले आहेत. मंगळवारी सकाळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याजवळ प्रशांत कॉर्नरच्या बाजूला महाकाय वृक्ष कोसळून एक बस, एक टेम्पो, दोन कार, एक तीन चाकी आणि सहा दुचाकी अशा एकूण 11 वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या पडझडीत कामावर जाणाऱ्या पादचाऱ्याला दुखापत झाली.
पादचाऱ्याच्या डोके आणि छातीला दुखापत
या झाडामुळे बॉम्ब शोधक पथक, खासगी वाहनांचे नुकसान झाले. यावेळी ज्ञानेश्वर नगर येथील साईधाम सोसायटीत राहणारे पवन झा (वय५२) कामावर जात होते. त्यांच्या अंगावर झाड पडले. त्यामुळे झा यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
