शेतकऱ्याची सद्यस्थिती अतिशय वाईट आहे. मात्र गहू, तांदूळ, ज्वारी पेरल्याने शेतकऱ्याची गरिबी हटणार नाही. त्यासाठी त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅस उत्पादन करावं, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. ते अमरावतीत बोलत होते.
“शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे. शेतकरी दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. जर ही गरिबी हटवायची असेल, तर शेतकऱ्यांनी पारंपारिक पीकं सोडून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं. इथेनॉलनिर्मिती वगैरे करून, आधुनिकतेची कास धरावी” असं गडकरी म्हणाले.
शेतकऱ्यांनी पारंपारिक पीकांऐवजी पेट्रोल, डिझेल आणि गॅस तयार करायला हवा, असं गडकरींनी नमूद केलं. सध्या आपल्या पूर्ती उद्योग समूहात शेतकऱ्यांनी निर्मित केलेलं इथेनॉल गाड्यांमध्ये इंधन म्हणून वापरण्यात येत आहे. पाच टक्के इथेनॉल गाड्यांमध्ये वापरण्यात येत असल्याचं गडकरींनी सांगितलं.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेती करावी, असा सल्ला गडकरींनी दिला आहे.
