राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांच्या संख्या २०० वर पोहोचली आहे. नुकतंच या आजाराशी झुंज देणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या तरुणीचा जीबीएस सिंड्रोम आजाराने मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती.
सिंहगड परिसरात राहणाऱ्या किरणला GBSची लागण
किरण राजेंद्र देशमुख हिचे आज मंगळवारी निधन झाले. रात्री उशिरा बारामतीतील जळोची येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किरणच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान पुण्यामध्ये जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण वाढू लागले आणि किरण राहत असलेल्या परिसरातही रुग्ण आढळले. दरम्यान किरणच्या नातेवाईकांनाही अचानक त्रास जाणवू लागला आणि किरणला देखील त्रास होऊ लागला.
जुलाब आणि अशक्तपणामुळे बारामतीत कुटुंबांकडे आलेल्या किरणला तिच्या कुटुंबीयांनी बारामतीतील तज्ञांना दाखवले. तेव्हा तज्ञांना तिच्या लक्षणावरून शंका आली आणि त्यांनी पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती खालावत गेली आणि आज १८ फेब्रुवारी रोजी तिचे निधन झाले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे. तरुणीच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS हा आजार नेमका काय?
दरम्यान, आतापर्यंत राज्यात ९ जणांचा GBS मुळे मृत्यू झाला आहे. GBS अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम हा ऑटोइम्यून डिसऑर्डर, आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकार शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नानूंमध्ये कमकुवतपणा येतो. तसंच गंभीर आजारात अर्धांगवायू देखील होता.