पहाटे चालण्याचा व्यायाम किंवा रात्री जेवणानंतर शतपावली करणाऱ्या पुणेकरांनो सावधान… असे म्हणण्याची वेळ आली आहे; कारण दुचाकीस्वार चोरट्यांकडून लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. वेगाने येणारे चोर प्रामुख्याने ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पसार होत आहेत.
नव्या वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यात शहरभरात जबरी चोरीच्या २१हून अधिक घटना घडल्या असून, दुचाकीस्वार चोरट्यांना रोखण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. एरंडवणे येथील राजा मंत्री रस्त्यावर (डीपी रस्ता) नऊ फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला शस्त्राच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत २४ वर्षीय तरुणाने अलंकार पोलिसांत तक्रार दिली आहे. औंध येथील क्वीन्स टॉवर सोसायटीच्या परिसरात चालण्याचा व्यायाम करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ६० हजारांची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. त्यांच्या मुलाने चतुःश्रृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे.
काही दिवसांपूर्वी नवसह्याद्री सोसायटीत औदुंबर इमारतीसमोर २२ जानेवारी रोजी पहाटे पावणेसातच्या सुमारास ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या ८३ वर्षीय महिलेला ढकलून देऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावले होते. त्यानंतर चार फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता कात्रज तलावाकडून उत्कर्ष सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या ८० वर्षीय महिलेला अडवून त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले.
टिंगरेनगरमधील विद्यानगर येथील शांती निकेतन सोसायटीसमोर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ७५ वर्षीय महिला चालण्याचा व्यायाम करीत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी तिला अडवले. त्यानंतर तिच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला होता. भवानी पेठेतील लोखंड बाजार परिसरातही शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र व सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाची वाट पाहताना लुटले एरंडवणे भागातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाजवळ रिक्षाची वाट पाहणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावल्याची घटना रविवारी (१६ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास घडली. वारज्यातील अतुलनगर परिसरातही रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रिक्षाची प्रतीक्षा करणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेले. या दोन्ही घटनांबाबत अलंकार व वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गस्त वाढवूनही लूट सुरूच लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘कॉन्स्टेबल ऑन पेट्रोलिंग’ (कॉप- २४) ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात या योजनेचे उद्घाटन करण्यात आले असून, या विशेष पथकात ७२६ पोलिस कर्मचारी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अहोरात्र गस्त घालणार आहेत; शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘बीट मार्शल’ नाही तैनात करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही दुचाकीस्वार चोरट्यांकडून लुटमारीच्या घटना सुरूच आहेत.
मी दररोज सायंकाळी डीपी रस्त्यालगतच्या पदपथावर चालायला जाते. त्या वेळी रस्त्यावर वर्दळ असते; परंतु पदपथ सोडून रस्त्यावरून चालणाऱ्या बेसावध महिलांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरटे गैरफायदा घेऊन हिसकावतात. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली पाहिजे. व्यायाम करायला येणाऱ्यांनीही शक्यतो सोन्याचे दागिने घालू नये