छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती असून राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. स्वराज्याचं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांनी मावळ्यांच्या मदतीने मुघल आणि अदिलशाहीला अनेक दशकं झुंजवलं. या संघर्षामध्ये शिवरायांप्रती इमान राखणाऱ्या हजारो मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचं प्रतिक म्हणून राजमुद्रा, शिवमुद्रा आणि स्वराज्याचं सिंहासन ओळखलं जाऊ लागलं. मात्र या स्वराज्याचं सिहासनाचं पुढे काय झालं याबद्दलचं गूढ आजही कायम आहे. स्वराज्याचं मानचिन्हं असलेल्या या सिंहासनाचा नंतर इतिहासात उल्लेख दिसून येत नाही. मात्र या हिरे, पाचू माणिकांनी मढवलेल्या 32 मण (144 किलो) सोन्याच्या इतिहासाबद्दल वेगवेगळे दावे मात्र केले जातात. यापैकीच एक दावा म्हणजे हे सिंहासन ब्रिटीशांच्या हाती लागू नये म्हणून पेशव्यांनी ते पुरलं. नेमका हा दावा काय आहे आणि कुठे हे सिंहासन पुरण्यात आलं आहे जाणून घेऊयात…
पेशव्यांनी केला सिंहासनाचा उल्लेख…
पेशव्यांच्या कागदांमध्ये सिंहासनाच्या देखभालीच्या खर्चाचा उल्लेखही आढळतो. 1797 पर्यंत सिंहासनाची पूजा आणि देखभाल होत होती असाही उल्लेख आढळतो. पण त्यावेळी ते सिंहासन कोणत्या स्वरुपात होतं याचाही नेमका उल्लेख कुठंही सापडत नाही.
कुठे पुरलं हे सिंहासन?
सिंहासनाविषयी आणखी एका दंतकथा सांगितली जाते. हे सारं 1818 च्या काळात घडल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे हेच ते वर्ष आहे जेव्हा पेशवाई संपली आणि सर्व कारभार ब्रिटीशांच्या हाती गेला. रायगड ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्याआधी रायगडावरील खंडोजी आणि यशवंता या सरदारांनी आपल्या साथीला काही निवडक माणसं घेतल्याचं सांगितलं जातं. या सगळ्यांनी सिंहासन लाकडी तराफ्यावर ठेऊन मेणा दरवाजापर्यंत नेलं. तिथून काळकाई खडग्यातल्या वाघ जबड्यात ते सिंहासन खाली उतरवण्यात आलं. तसेच हे जड सिंहासन पुढे घेऊन जाणं शक्य नसल्याने तिथेच ते पुरण्यात आल्याचं सांगण्यात येतं. खंडोजी आणि यशवंता सरदारांनी सात मावळ्यांचे परतीचे दोर कापले. नंतर दोघांनीही आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे हे सिंहासन नेमकं कोणत्या ठिकाणी याचा कोणताच पुरावा अथवा साक्षीदार राहिला नसल्याचा दावा केला जातो. पण ही फक्त दंतकथाच आहे. या दंतकथेला कोणताही पुरावा नाही.
स्वात्रंत्र्योत्तर काळातही शोध घेतला पण…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा स्वात्रंत्र्योत्तर काळातही शोध घेण्याचा प्रयत्न झाला. 1980-81 मध्ये सध्याची मेघडंबरी उभारण्याचं काम हाती घेतलं होतं. मेघडंबरीच्या उभारणीपूर्वी या ठिकाणी पुरातत्व खात्यानं उत्खनन हाती घेण्यात आलं. त्यावेळी तिथं सिंहासनाचा मूळ चौथरा सापडल्याचा दावा करण्यात येतो. त्या ठिकाणी एक शिवराई नाणंही सापडल्याचं अभ्यासक सांगतात.