मागच्या सरकारमध्ये महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची योजना जाहीर करण्यात आली. यानंतर महिलांनी मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास केल्याची आकडेवारी महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केली होती. या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याचा आरोप विरोधकांकडून राज्य सरकार वारंवार करण्यात आला. पण राज्य सरकारने वेळोवेळी हे आरोप फेटाळले होते. मात्र आज अखेर यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जाहीर कबुली दिली आहे. काय म्हणाले प्रताप सरनाईक? सविस्तर जाणून घेऊया.
एसटी तोट्यात गेल्याची कबुली
महिलांना देण्यात आलेल्या सवलतीमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली. महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली. यामुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतोय, असे सरनाईक म्हणाले. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्ये केले.
‘सध्या सुरु असलेली सवलत बंद होणार नाही’
व्हाईस ऑफ मेडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचे वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे महायुती सरकारच्या एसटी प्रवासात महिलांच्या सवलत योजनेमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुली जणू परिवहन मंत्री यांनी दिल्याचे बोलले जात आहे.सध्या सुरु असलेली सवलत बंद होणार नाही. पण आता नवी सवलत देण्यात येणार नाही.
‘एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 60 टक्के एसटी बस भंगार’
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील साठ टक्के एसटी बस भंगार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. भाडेवाढ केल्यामुळे एसटीचा तोटा कमी झाला, एसटी सुरळीत व्हायला दोन ते तीन वर्षे लागतील, असे ते म्हणाले. पाच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नव्हती खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्याला काही एक अर्थ नाही, असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी खासदार संजय राऊत यांचा दावा फेटाळला.