बचत गटाच्या गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पैसे मागायला गेल्यावर महिलांनाच काळ्या जादूची भीती दाखवण्यात आली. थेट वंशाचा दिवा संपवण्याची धमकी महिलांना दिल्याचा आरोप आहे. महिलांच्या घरात लिंबू, सुया, राख टाकण्याचे खळबळजनक प्रकार समोर आले आहेत. कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या सचिवांवर आरोप होत आहेत.
सीसीटीव्हीत संशयास्पद हालचाली
धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. महिलांच्या घरात राख, लिंबू टाकताना सीसीटीव्हीत संशयास्पद हालचाली कैद झाल्या आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोपी महिलेला दोन संशयास्पद व्यक्तींकडून काळ्या जादूचे धडे मिळाल्याचा दावा केला जात आहे. दिवे लावत, पूजा मांडत आरोपी भीती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावाला भेट दिली असून पीडित महिलांसोबत चर्चा सुरु आहे.
४० हून जास्त महिलांची फसवणूक
बचत गटाच्या महिला सचिवाने विश्वासात घेत ४० हून जास्त महिलांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. बचत गट, भिसी आणि मायक्रो फायनान्सचे लाखो रुपये गोड बोलून घेतले, पैसे परत मागायला गेल्यावर अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगत धमकावल्याचा आरोप आहे.