केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात भारतीय खेळण्यांच्या उद्योगाला उभारी देण्यासाठी आर्थिक तरतुदीची घोषणा केली आहे. चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्तातील खेळण्यांना सक्षम पर्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या पारंपरिक लाकडी खेळणी व भातुकली व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
‘मेड इन इंडिया’ खेळण्यांना बाजारपेठ आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ‘क्लस्टर रुम’ आणि ‘पॉश लूम’च्या माध्यमातून व्यापारसुलभ वातावरण तयार करण्याचा सरकारचा मानस आहे. या घोषणेचे सावंतवाडीतील लाकडी खेळणी तयार करणारे उद्योजक आणि कारागीर यांनी स्वागत केले आहे. ‘सावंतवाडी पॅटर्न’ चिनी खेळण्यांना तगडी स्पर्धा देईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे आपल्या लाकडी खेळण्यांना जागतिक ओळख मिळेल, अशी अपेक्षा शुभदादेवी भोसले यांनी व्यक्त केली. सावंतवाडीच्या खेळण्यांना यापूर्वीच जीआय मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्र ‘गंजिफा’ तयार करणारे एकमेव राज्य आहे. केंद्राच्या निर्णयामुळे या खेळणी उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आहे.
पुन्हा राजाश्रय
लाकडी खेळण्यांचा व्यापार वाढविण्यात सावंतवाडीच्या राजघराण्याचे मोठे योगदान आहे. श्रीमंत बापुसाहेब महाराज आणि त्यानंतर श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी कारागिरांना प्रोत्साहन दिले. लाखकामाचे पुनरुज्जीवन केले. सत्वशीलादेवी भोसले यांनी हा वारसा जपला. आजही शुभदादेवी भोसले आणि श्रद्धाराजे भोसले यांची मदत आणि मार्गदर्शन कारागिरांना मिळते. आता केंद्र सरकारकडूनही राजाश्रय मिळणार असल्यामुळे खेळणी उद्योग भरभराटीला येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.