पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान महानगरपालिकेमार्फत नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा ५ व ६ फेब्रुवारी रोजी खंडित करून नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण ३० तास पालिकेच्या एस, एल, के पूर्व , एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील काही परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
संबंधित परिसरातील नागरिकांनी आदल्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.