रायगडचा तत्कालीन लाचखोर उपजिल्हाधिकारी नितेश ठाकूरने देशाबाहेर पलायन केल्याचं सांगण्यात येत आहे. एसीबी आणि पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ठाकूरनं थेट नेपाळमार्गे पलायन केल्याचं समजतंय.
एसीबीनं 2012 मध्ये ठाकूरच्या घरावर छापा मारला होता. त्यावेळी तब्बल 144 कोटींचं घबाड मिळालं होतं. यानंतर काही दिवसातच त्याला जामीनही मिळाला. मात्र आता पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ठाकूर परदेशात पळाल्याची माहिती मिळतेय.
विशेष म्हणजे 2 एप्रिल 2013 मध्येही ठाकूरनं पलायन करण्याचा प्रयत्न केला असता त्याला मुंबईच्या विमानतळावर पकडण्यात आलं होतं. मात्र यानंतरही ठाकूरला तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आलं नाही किंवा त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला नाही. तेव्हापासूनच ठाकूर बेपत्ता झाला.
दरम्यान ठाकूर हवाईमार्गे पळाला असल्यास त्याला पकडणं सोपं जाईल, मात्र तो रस्तेमार्गे पळाल्यास त्याला शोधणं कठीण असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनं म्हटलं आहे.

