राजस्थानमध्ये एका महिलेने 5.970 किलो वजनाच्या एका बाळाला जन्म दिला आहे. हे देशातील वजनदार बाळ असल्याचं म्हटलं जात आहे. श्रीगंगानगर जिल्हा रुग्णालयात रविंद्र सिंह यांची पत्नी गोगाबाई यांनी बुधवारी दुपारी 12.17 वाजता मुलाला जन्म दिला. बाळाचं वजन जास्त असल्याने महिलेची सीझेरियन डिलिव्हरी झाली.
डॉक्टरांच्या नोंदणीनुसार हे देशातील सर्वात जास्त वजन असेलेलं बाळ आहे. यापूर्वी मणिपूरमध्ये 5.900 किलोग्रॅम वजनाच्या बाळाचा जन्म झाला होता.
दरम्यान, बाळाच्या आईचं वजनही 100 किलोग्रॅम आहे. श्वास घेण्यास अडथळे येत असल्याने बाळाला चाईल्ड केअर यूनिटमध्ये ठेवलं आहे. तर गोगाबाई सध्या आयसीयूमध्ये आहेत.
डॉक्टर काय म्हणाले?
रुग्णालयाच्या डॉक्टर अनामिका अग्रवाल म्हणाल्या की, “साधारणत: 2.5 ते 4 किलोच्या दरम्यान असतं. गोगाबाई यांना पाहून बाळ पण वजनदार असणार असा वाटत होतं. बाळ 4-5 किलोचं असेल, असा आमचा अंदाज होता. पण जेव्हा बाळाचं वजन केलं, तेव्हा आम्हाला धक्काच बसला.”
देशातील वजनदार बालकं
– 21 फेब्रुवारी, 2014 रोजी इंफाळ (मणिपूर)च्या शेनू देवी यांनी (वय 37 वर्ष) 5.900 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला होता
– 2010 मध्ये गुजरातच्या सूरतमध्ये 5.7 किलो वजनाच्या एका बाळाचा जन्म झाला होता.
जगातील सर्वात वजनदार बाळ
जगातील सर्वात वजनदार बाळ ब्रिटनमधील असल्याचं म्हटलं जातं. नोंदणीनुसार, ब्रिटनच्या हॅरीचं जन्मावेळी 6.2 किलो वजन होतं. तर 1879 मध्ये कॅनडामध्ये 10.8 किलो वजनाचं बाळ जन्मलं होतं, परंतु ते फक्त 11 तासच जिवंत राहिलं होतं.
बाळाचं वजन जास्त कसं?
डॉ. स्मृती छाब्रा यांच्या माहितीनुसार, बाळाचं वजन जास्त असणं हे आईवर अवलंबून असतं. ज्या महिलांना रक्तदाब, डायबेटीज आणि स्थूलपणाच्या तक्रारी असतात, त्यांच्या बाळाचं वजन जास्त असण्याची शक्यता आहे.
आईचं वजनही जास्त
गोगाबाई यांचं वजन 100 किलो असल्याचं पती रविंद्र सिंह यांनी सांगितलं. श्रीगंगानगरला आणण्याआधी त्यांनी त्यांच्या गर्भार पत्नीला कधीही डॉक्टरांना दाखवलं नव्हतं. रविंद्र सिंह सूरतगडच्या मानेवाला इथले रहिवासी आहेत.

