घडयाळाच्या काटयावर धावणा-या मुंबईत दररोज ८० जणांचा मृत्यू हृदयविकाराने होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती.
या पार्श्वभूमीवर हृदयविकाराची ही वाढती आकडेवारी पाहता ‘जागतिक हृदय दिना’चे औचित्य साधत एका संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ५१ टक्के मुंबईकर हृदयविकाराना कारणीभूत ठरणा-या लक्षणांबाबत गाफील आहेत. या आजाराच्या लक्षणांबाबत पुरेशी माहिती नसल्याने या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
मुंबईतील माटुंगा, दादर, परेल, लालबाग, भायखळा व मस्जिद बंदर या उपनगरातील विविध परिसरातील २० ते ६० वयोगटांतील व्यक्तींना घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत कोणालाही हृदयविकार जडण्याची शक्यता असते असे सांगण्यात आले. तसेच, आताची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक संभवतो.
या कारणांमुळे आहार, व्यायामाच्या सवयी, तणावावर नियंत्रण ठेवण्यात येणारे अपयश आणि आपल्याला असलेल्या आरोग्यविषयीची जागरूकता, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. वाढत्या हृदयविकाराचे कारण व या जीवघेण्या आजाराला व्यायामाचा अभाव व निकृष्ट आहार किती कारणाभूत आहे, हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश होता.
या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक लोकांना उघडयावरील पदार्थ खाण्याची सवय असल्याचे दिसून आले आहे. लोकांच्या आहारामध्ये पालेभाज्या, फळे व कडधान्य यांचे प्रमाण कमी होऊन त्यांची जागा आता पिझ्झा, बर्गर या पदार्थानी घ्यायला सुरुवात केली आहे. याशिवाय ५३ टक्के लोक दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी घेऊन घेत नसून ८० टक्के लोक व्यायाम करत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
महिलांना हृदयविकाराचा अधिक धोका
या सर्वेक्षणानुसार पुरुषांच्या तुलनेत ५५ टक्के महिलांमध्ये अनियमित व्यायाम व उत्तम जेवणाचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे या महिलांना हृदयविकार होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, जीवनशैलीत बदल, संतुलित आहार, दररोज व्यायाम केल्याने हृदयविकारांना कारणीभूत असलेल्या कोलेस्ट्रॉल, ग्लूकोजची पातळी आणि रक्तदाब अशा अनेक लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकेल.
महिलांना घराचा व बाहेरचा ताण अधिक असतो. पण, ताणामुळे मृत्यू होत नाही, पण ताणामुळे उद्भवणारी परिस्थिती मृत्यूस कारण ठरू शकते. ते टाळण्यासाठी महिलांनी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे मत हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अजित मेनन यांनी व्यक्त केले आहे.
शीव रुग्णालयात ३ हजार रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया
शीव रुग्णालयाच्या हृदयरोगोपचार विभागाला मागील वर्षी ८३,००० रुग्णांनी भेट दिली. त्यापैकी तीन हजार रुग्णांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. परंतु या उपचाराचा खर्च परवडण्याजोगा नसल्याने गरीब रुग्ण उपचार करणे टाळतो. मात्र आजार बळावल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.
शिवाय, अनेक रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात. त्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे शक्य होत नाही. तसेच हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुमारे दोन तृतीयांश रुग्णांच्या उपचारांना विलंब होऊन रुग्ण दगावतो. यामुळे रुग्णालयात गरजू रुग्णांना कमी दरात उत्तम उपचार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रुग्णालयात प्रशासनाचेही आम्हाला सहकार्य मिळत आहे.

