ढोल-ताशाच्या दणदणाटात गुलाल व फुलांची उधळण करीत मुंबईसह राज्यात लाडक्या गणरायाचे उत्साहात विसर्जन झाले.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, ढोल-ताशाच्या दणदणाटात, बँड पथकांच्या तालावर, गुलाल व फुलांची प्रचंड उधळण करीत मुंबईसह राज्यात लाडक्या गणरायाचे उत्साहात विसर्जन होत आहे. विसर्जनासाठी अलोट गर्दी उसळली होती.
मुंबईचा राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघाली होती.मिरवणुकीत बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि मुंबईच्या महापौर बंगल्यातील गणरायाचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. मुंबईत विसर्जनासाठी महापालिकेतर्फे २६ कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते. मुंबईतील महापौर बंगल्याच्या परिसरातही एक विसर्जन तलाव बनवला आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आई, मुलगी आणि पत्नीसह आरती करुन गणरायाचे विसर्जन केले.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीलाही सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यातही मोठी गर्दी उसळली होती.
पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि महापौर दत्ता धनकवडे यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीला सुरुवात केली.
पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
मानाचे पहिले तीन गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या कसबा, तांबडी जोगेश्वरी आणि गुरुजी तालीम या मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन डेक्कनजवळील नटेश्वर घाट याठिकाणी तयार करण्यात आलेल्या हौदात झाले.
पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
तर तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा या मानाच्या उर्वरीत दोन गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मंडई मंडळाच्या मूर्ती खंडुजीबाबा चौकाजवळ पांचाळेश्वर घाटावर विसर्जित झाल्या.

