महापौर आणि आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला.
डॉक्टरांना मारहाण करणा-या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच महापौर आणि आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याने चिडलेल्या नातेवाईकांनी दोन दिवसांपूर्वी केईएममधील तीन डॉक्टरांना लोखंडी सळीने मारहाण केली होती. या मारहाणीनंतर केईएम रुग्णालयातील ३५० निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरु केले होते.
रविवारी संध्याकाळी पाच वाजता निवासी डॉक्टर कामावर परतल्याचे डॉक्टरांच्या संघटनेतर्फे सांगण्यात आले. यामुळे येथील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

