गोमांस बंदीवरुन केंद्र सरकारमधील मंत्र्यांमध्येच जुंपण्याची चिन्हे असून मी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणारं असे आव्हान केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिले आहे. प्रत्येक राज्यामधील चित्र वेगळे असून महाराष्ट्र, गुजरातसारख्या हिंदुंची संख्या जास्त असलेल्या राज्यांमध्ये गोमांस बंदी केली असेल तर तो त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
‘मी ही बीफ खातो मी अरुणाचल प्रदेशचा आहे. कोणी मला खाण्यापासून रोखू शकते? असा सवाल केला आहे.
भारत लोकशाही देश आहे. जर मिझो ख्रिस्तियन म्हणत असतील की ही भूमी येशूची आहे तर पंजाब अथवा हरयणातील लोकांना काय अडचण असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणच्या विचारांचा आपण आदर केला पाहिजे असे रिजीजू म्हणाले.
भारत हा विविध जातींचा, विविध धर्मांचा आणि विविध समुदायांचा देश आहे. लोकांनी प्रत्येक जातीधर्मांचा आदर करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमची श्रद्धा, विचार कोणावर लादू शकत नाही, असे रिजीजूंनी सांगितले.

