कोकण मार्गावरील पहिली प्रीमियम रेल्वे तेजस एक्स्प्रेसच्या प्रतिष्ठेसह आता वक्तशीरपणातही घसरण झाली आहे. गेल्या सात महिन्यांत मडगाव-मुंबई तेजसचा वक्तशीरपणा २० टक्के आणि मुंबई-मडगाव तेजसचा वक्तशीरपणा ४५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तेजसमधील ‘इन्फोटेन्मेंट’ सुविधा बंद आहे. आसनामागे स्क्रिनऐवजी प्लाय लावण्यात आले आहेत. प्रीमियम दर देऊन वक्तशीरपणासह अन्य सुविधा नसतील, तर जास्त रुपये मोजून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा फायदा काय, असा प्रश्न आहे.
वक्तशीरपणाचा टक्का घसरला
गेल्या काही महिन्यांत सात ते आठ तास, अनेकदा त्याहून अधिक विलंबाने एक्स्प्रेस धावत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. कोकण आणि मध्य रेल्वेवर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव, सीएसएमटी-मंगळुरू या गाड्यांच्या वक्तशीरपणाची १ नोव्हेंबर २०२५ ते १८ मे २०२६ या कालावधीतील सत्यस्थिती माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आली. गाडी क्रमांक २२१२० मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस १४२ फेऱ्यांपैकी केवळ २९ वेळा वेळेवर धावली. (२२११९) मुंबई-मडगाव एक्स्प्रेस १४२ फेऱ्यांपैकी केवळ ६४ वेळा वेळेवर धावली आहे. उर्वरित वेळेत तेजस एक्स्प्रेस एक तासापासून सात ते आठ तासांदरम्यान विलंबाने धावली. गेल्या सात महिन्यांत तेजस एक्स्प्रेसचा किमान वक्तशीरपणा २० टक्के होता. तेजस वगळता (११०९९) एलटीटी-मडगाव, (१११००) मडगाव-एलटीटी एक्स्प्रेसचा किमान वक्तशीरपणा ३० टक्के, (२२११५) एलटीटी-करमाळी आणि (२२११६) करमाळी-एलटीटीचा २५ टक्के आहे.
