‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आयुष्याची अखेर केली. रविवारी रात्री नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास घेऊन तिने जीव दिला. त्यानंतर उगले कुटुंबाची रडून रडून बिकट अवस्था झाली आहे. लेकीच्या अंत्यदर्शनावेळी व्याकुळ झालेल्या माऊलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
राहत्या घरात आयुष्याची अखेर
संचिता ही नालासोपारा पूर्व भागातील आचोळे येथील साई संतोषी अपार्टमेंटमध्ये आई वडिलांसह राहत होती. रविवारी संध्याकाळनंतर तिने आपल्या बेडरुमचा दरवाजा लावून घेतला होता. बराच वेळ झाला तरी तिने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ती पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला त्वरित पालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आईचा काळजाला भोकं पाडणारा प्रश्न
संचिताच्या अंत्यसंस्कारापूर्वीचे काही क्षण कॅमेरात कैद झाले आहेत. ‘संचू ए संचू उठ ना… तू मला आई म्हण ना.. ए बबड्या.. का असं केलंस गं?’ असं संचिताची आई तिला व्याकुळ होऊन विचारताना व्हिडिओमध्ये ऐकू येतं. हे ऐकून उपस्थितांच्या काळजालाही घरं पडत आहेत. दरम्यान, तिने जीव देण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे आढळले नाही. आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद वाघ यांनी दिली.
