ऑनलाईन अंडी मागवली, पण फोडताच उग्र वास, ठाण्यात योग ट्रेनर महिलेची FDA कडे तक्रार

नामांकित ऑनलाइन वितरण सेवेद्वारे मागवलेल्या प्रसिद्ध ब्रँडच्या अंड्यांच्या ‘ट्रे’मध्ये सडलेली अंडी आढळल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. या प्रकरणी कळव्यातील खारेगाव परिसरात राहणाऱ्या योग ट्रेनर सुवर्णा चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या अंड्यांना प्रचंड उग्र वास येत असल्याने अशी अंडी खाल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती चौधरी यांनी व्यक्त केली. सुवर्णा चौधरी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी रितसर तक्रार देखील केली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खारेगाव भागात राहणाऱ्या सुवर्णा चौधरी यांनी १२ जून रोजी ऑनलाइन वितरण सेवेद्वारे अंडी मागवली होती. या अंड्यांवर २३ जून २०२६ ही अंतिम वापर तारीख नमूद असतानाही, १४ जून रोजी ऑम्लेट बनवण्यासाठी अंडी फोडल्यानंतर ती सडलेली असल्याचे आढळले. या अंड्यांतून तीव्र दुर्गंधी येत असल्याने ती खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. सुवर्णा यांनी या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकडून नागरिकांच्या जीवाशी असा खेळ होणार नाही, अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांकडून दिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *