महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या मंदिरातून गायब झालेलं सोनं, चांदी आणि रोख रक्कमेचा मोठा खुलासा झाला आहे. 1989 ते 2009 या 20 वर्षात तब्बल 120 किलो सोनं, 480 किलो चांदी, 240 कोटी रुपये गायब झाल्याचा संशय आहे.
मंदिराच्या कारभाराचं लेखापरीक्षण करुन त्याचा गुप्त अहवाल सीआयडीला सादर करण्यात आला. या अहवालामुळे राज्याच्या सनदी सेवेत वरिष्ठ पदावर पोहोचलेले अनेक अधिकारी अडचणी आले आहे. त्यामुळेच की काय सीआयडीने चौकशीसाठी पाठवलेली प्रश्नावली गृहसचिवांच्या कार्यालयातून गायब होण्याची किमया घडली आहे.
लातूरच्या विशेष लेखा परिक्षण पथकाने 1989 ते 2009 असा 20 वर्षांचा तुळजाभवानी मंदिराचा ताळेबंद मांडला. 348 पानांचा हा अहवाल ऑगस्ट 2014 ला विभागीय आयुक्तांना आणि तिथून तो सीआयडीला सादर झाला..
20 वर्षात मंदिराच्या दान पेटीत आलेले हिरे, मोती, पाचू गायब झाले आहेत. वर्षाला 6 किलो सोनं, 24 किलो चांदी आणि 12 कोटी रुपये रोकड जमा होतात. या हिशोबाने 20 वर्षात 120 किलो सोनं, 480 किलो चांदी आणि 240 कोटी गडप झाले आहेत.
लेखापरीक्षण करणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटटनी अनेकदा आक्षेप नोंदवला, पण जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याकडे सोईस्कर कानाडोळा केला.
मंदिराचा कारभार उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. तहसीलदार सचिव आहेत, तर आमदार आणि नगराध्यक्ष सदस्य आहेत. हैदराबादच्या निजामाने बजावलेल्या देऊळ कवायतीवर मंदिराचा कारभार चालतो.
नवरात्राच्या घटस्थापनेला वर्षभरासाठी 5 दानपेट्यांचं टेंडर काढलं जातं. कंत्राटदाराने प्रत्येक अमावस्येला पैसे भरायचे होते. पण चौकशीत अनेक त्रुटी दिसून आल्या. दान पेटीच्या चाव्या कोणाकडे आहेत हे आजवर स्पष्ट झाल नाही. दानपेटीतलं सोनं, चांदी संस्थानच्या मालकीचं असल्याचं दडवून ठेवलं. सिंहासन पेटी उघडताना मंदिर संस्थानचा प्रतिनिधी मुद्दाम हजर राहिला नाही.
दोन वर्षापासून या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी सुरु आहे, पण तीही कासवगतीने
शिवछत्रपतींच्या कुलस्वामीनीसमोरच्या दानावर 20 वर्षे राजरोस दरोडा पडत होता आणि प्रशासन मूकपणे सगळं पाहात राहिलं. एकवेळ सीआयडी चोरीला गेलेल्या दानाची किंमत ठरवेल, पण भोळ्या भाबड्या भक्तांच्या लुटल्या गेलेल्या भक्तीभावाची काय किंमत करणार ?

