सोमनाथ यांनी पोलिसांसमोर समर्पण केले पाहिजे- केजरीवाल

सोमनाथ यांनी पोलिसांसमोर समर्पण केले पाहिजे- केजरीवाल

कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप असलेले माजी कायदामंत्री व आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, असा सल्ला ‘आप’चे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. भारती यांचा दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, तेव्हापासून ते फरार आहेत.

‘सोमनाथ यांनी पोलिसांसमोर समर्पण केले पाहिजे. ते लांब का पळत आहेत? जेलमध्ये जाण्याची त्यांना भीती का वाटते? त्यांचे हे पळपुटे वागणे पक्ष व कुटुंबासाठी लज्जास्पद ठरत आहे. त्यांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे’, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

भारती यांच्याविरुद्ध त्यांची पत्नी लिपिका मित्रा हिने कौटुंबिक हिंसाचार व हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच भारती यांनी दिल्ली कनिष्ठ न्यायालयात धाव घेत अटक टाळण्यासाठी याचिका दाखल केली.

मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत भारतींविरोधात अटक वॉरंट काढले होते. या निर्णयाला भारती यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानेही आधीचा निर्णय कायम ठेवत भारतींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोधही सुरू केला, मात्र ते त्यांच्या निवासस्थानी सापडले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करता आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *