सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्याच्या डोंगराळ पट्टयात २२ पट्टेरी वाघ आढळल्याची शास्त्रीय नोंद असतानाच प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली परिसरातही वाघांचा संचार असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, व्याघ्रसंचाराची छायाचित्रे, चित्रफिती वेळोवेळी सादर होऊनही वनविभाग याचा इन्कार करत आहे. त्यामुळे पर्यावरणवादी संस्थांनी हा परिसर संवेदनशील म्हणून जाहीर करण्यासाठी थेट न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील घनदाट जंगलांनी मढलेल्या कोकणाच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक शासकीय स्तरावर होत असले तरी, त्याच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट या डोंगराळ भागात विकासकामे आणि पर्यटनकेंद्राच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यासाठी वनशक्ती संस्थेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खडपडे येथे पट्टेरी वाघ आढळल्याची चित्रफित काही दिवसांपूर्वी प्रसारीत झाली होती. हा पुरावा न्यायालयात सादर करण्यासाठी स्टॅलिन यांनी येथे जाऊन पाहणी केली असता, त्यांनाही वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले. वाघाची काही ताजी छायाचित्रेही त्यांना मिळाली आहेत.