गेल्या आठवड्यात वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक नुकतीच पालिका मुख्यालयात पार पडली.
‘महापालिका दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करत असली, तरी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे केवळ नालेसफाईवर भर न देता पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १०० कोटी रुपयांची विशेष तरतूद करून दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. असे यावेळी महापौर अजीव पाटील यांनी सांगितले. तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक जाणकारांकडून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचे जुने मार्ग समजून घेऊन त्यानुसार उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ठिकाणी संबंधित विभागाची परवानगी घेऊन अडथळे दूर करावेत. तसेच ज्या ठिकाणी जुने पाण्याचे मार्ग बंद झाले आहेत, तेथे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी समन्वय साधून ते मार्ग खुले करण्याचा किंवा आवश्यकतेनुसार नवीन नाले उभारण्याचा पर्यायही विचारात घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधताना शहरातील पूरस्थितीस रेल्वे हद्दीतील नाले आणि कल्व्हर्टची अपुरी सफाईही कारणीभूत ठरत असल्याचे नमूद केले. शहरातील मुख्य नाले खाडीमुखापासून उगमस्थानापर्यंत टप्प्याटप्प्याने रुंद करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रेल्वे हद्दीतील नालेसफाईसाठी परवानगी प्रक्रियेमुळे अडथळे निर्माण होत असल्याने अनेक ठिकाणी गाळ साचतो आणि पाणी तुंबते, असेही त्यांनी सांगितले.
रेल्वे मार्ग रुंदीकरण आणि फलाट उभारणीच्या कामांमुळे काही नैसर्गिक नाले अरुंद झाल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे शहरासह रेल्वे वाहतुकीलाही फटका बसत असल्याने रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीत नवीन गटारे आणि नाले उभारण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.
या बैठकीला रेल्वे विभागाचे अधिकारी, महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, शहर अभियंता प्रदीप पाचंगे, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
