नीट पेपरफुटीनंतर आता गुणांचा घोळ? उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण, पण स्कोअरकार्डवर फक्त…

नीट परीक्षेचा घोळ काही संपता संपत नाहीये. पेपरफुटीनंतर आता नीट परीक्षेचा निकाल वादात सापडला आहे. उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित मार्क आणि स्कोअर कार्डवरील मार्कमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. त्यामुळे आता नीटच्या निकालात घोटाळा आहे की काय अशी चर्चा सुरू झालीय. या निकालामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम असून त्यांनी कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केलीये.

नीट यूजी 2026 चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. बीडच्या सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर अवघे 95 गुण आले आहेत. त्यामुळे सोहमने या निकालावर आक्षेप घेतला आहे.

गवते कुटुंब अनपेक्षित निकालामुळे धक्क्यामध्ये आहे. एवढी मेहनत घेऊन नीट परीक्षा मधील गोंधळ आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करेल या भीतीने सोहमच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. तर सोहमलादेखील मोठा धक्का बसला आहे. यावेळी त्याला कसं सावरलं हे आम्हाला माहिती, असं सोहमच्या आईने सांगितलं आहे.

उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित मार्क आणि स्कोअर कार्डवरील मार्क या तफावतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी असून, निकालात दुरुस्ती न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून काय स्पष्टीकरण येते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. ‘नीट’ निकालातील या त्रुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून, एनटीएने याची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये मुलींमध्ये देशात पहिली

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळने हे घवघवीत यश संपादन केल्याने तिचे आई-वडील देखील आनंदी आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कृष्णा कुदळे आणि जयश्री कुदळे हे शिक्षक आहेत. मुलीने इतकं मोठं यश संपादन करेल असं वाटलं नव्हतं तीने यश संपादक केलं त्याचं कौतुक तिच्या आई-वडिलांना आहे. 720 पैकी तिने 710 मार्क मिळवले आहेत. बायोलॉजी मध्ये 360 पैकी 360 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 तर फीजिक्स 180 पैकी 175 मार्क मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *