तापमानामुळे अंडी महागली! नॉनव्हेज प्रेमींच्या खिशाला महागाईची झळ

मागील काही महिन्यात उन्हाळ्यातील असह्य तापमानामुळे कोंबड्या दगावण्याचं प्रमाण वाढलं आणि याचाच परिणाम हा अंडी उत्पादनावर पडलेला पाहायला मिळतोय. मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये एका अंड्याचे दर हे जवळपास 8 ते 10 रुपयांपर्यंत गेले आहेत. राज्यात यावेळी तीव्र तापमानामुळे जवळपास 15 टक्के कोंबड्या दगावल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अंडी देण्यायोग्य कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. याचाच परिणाम राज्यातील अंडी उत्पादनावर होऊन साधारण यात 15 टक्क्यांची घट झाली आहे.

उष्णतेचा कोंबड्यावर परिणाम : 

उन्हाळ्यात तापमान हे 38 अंशांच्या वर गेल्यामुळे कोंबड्या दगावण्याचं प्रमाण वाढलं होतं. पोल्ट्री फॉर्ममध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी पोल्ट्री चालकांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले मात्र तरीही महाराष्ट्रसह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड्या दगावल्या. कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढल्याने लहान पिलांची मागणी वाढली आहे.

पुढील काही महिने अंड्यांच्या किंमती चढ्याच असणार : 

महाराष्ट्रातील अंड्यांच्या मागणीतील तफावत ही काही प्रमाणात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातून अंड्यांची आयात करून भरून काढली जात आहे, मात्र उत्पादनात घट झाल्याने अंड्यांची आयात सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अंड्यांच्या किंमती या चढ्याच राहणार अशी माहिती विक्रेत्यांनी दिलेली आहे. अंड्यांच्या उत्पादनात 15 टक्क्यांनी घट झाली आहे. बाहेरील राज्यांतून अंडी येण्याचे प्रमाणही कमी आहे. सध्या शेतकऱ्यांना प्रति अंडे 7 ते 7.10 रुपयांना मिळतात. त्यामुळे मुंबई, पुण्यातील ग्राहकांना एक अंड जवळपास आठ ते दहा रुपयांना विकलं जात आहे.

विक्रेत्यांचं म्हणणं आहे की आधी कोंबड्यांच्या पिलांसाठी साधारण दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत होती मात्र आता तापमानामुळे अनेक कोंबड्या दगावल्या आणि त्यामुळे आता पिलांसाठी चार ते पाच महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागत आहे. कोंबडीचं एक पिल्लू हे 51 रुपयांना मिळतं. पोल्ट्रीमध्ये आणल्यानंतर कोंबडीच्या पिलांची चांगली जोपासना केली जाते त्यांचं लसीकरण करण्यात येतं आणि मग पाच महिन्यांनी ती पिल्लं अंडी देण्यास सुरुवात करतात. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे.

कोंबड्यांचं खाद्य सुद्धा महागलं : 

मागील काही महिन्यात कोंबडीच्या खाद्यांच्या किंमतींमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. जे खाद्य आधी 24 ते 26 रुपये किलो दराने मिळत होते. तेच खाद्य सध्या 31 ते 32 रुपयांवर गेलं आहे. सोयाबीन पेंड 65 हजार रुपये प्रतिटन, तर मका 27 रुपये किलोंवर गेला आहे. कोंबडी खाद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *