लिफ्टमध्ये शिरताच पाळीव कुत्र्याचा 3 तरुणींवर हल्ला, मालकिणीने आवरायचा प्रयत्न केला पण..

पाळीव कुत्रे आणि नागरिकांवर होणारे हल्ले हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला कारण ठरलीये मुंबईच्या मालाडमध्ये घडलेली घटना. मुंबईच्या मालाड पश्चिममधील एका उच्चभ्रू इमारतीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेठ आयरीन या इमारतीच्या लिफ्टमध्ये एका पाळीव कुत्र्याने तीन तरुणींवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं तिन्ही तरुणी घाबरल्या होत्या.

लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्याचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला सगळंच सामान्य दिसतेय. तीन मुली लिफ्टमध्ये आधीपासूनच होत्या. त्यानंतर एक महिला तिच्या पाळीव कुत्र्यासह लिफ्टमध्ये आली. आधी कुत्रा शांत होता. मात्र लिफ्टचा दरवाजा जसा बंद होतो त्यानंतर काहीच सेकंदात परिस्थिती बदलली.

सीसीटीव्हीमध्ये दिसतंय की, दरवाजा बंद झाल्यानंतर अचानक कुत्र्याने लिफ्टमधील काही मुलींवर हल्ला करायला सुरुवात केली. पाळीव कुत्रा सारखा मुलींच्या अंगावर धावून जाताना दिसतोय. तर, कुत्र्याची मालकिण त्याला सांभाळताना दिसतेय. अचानक हल्ला झाल्याने तिन्ही मुली खूप घाबरलेल्या दिसताहेत. इतक्या कमी व बंदिस्त जागेत हल्ला झाल्याने त्यांना पळून जाण्याचीही संधी नव्हती.

लिफ्ट एका मजल्यावर थांबल्यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा एक मुलगी लगेचच बाहेर आली. मात्र बाहेर जातानाही कुत्र्याने तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. पण सुदैवाने महिलेने त्याला आवर घातला आणि तरुणीला बाहेर जाण्यास मदत केली. कुत्र्याने चावा घेऊ नये म्हणून मास्क घालण्यात आला होता. त्यामुळं सुदैवाने कोणालाही गंभीर जखम झाली नाही.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. काहींनी प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. सोसायटीतील कॉमन एरिया जसं की लिफ्ट, पार्क आणि लॉबीमध्ये पाळीव प्राण्यांना आणताना सावधानी बाळगली पाहिजे. लहान मुलं, वृद्धांना यामुळं त्रास होऊ शकतो. ज्यांना प्राण्यांची भिती वाटते त्यांच्यासाठी हे खूप भयावह आहे. तर, काहींनी असंही म्हटलं आहे की, पाळीव प्राण्यांवर नियंत्रण ठेवणे हे त्यांच्या मालकांची जबाबदारी आहे, असं काहींची म्हणणं आहे.

आजकाल अनेक कुटुंबांसाठी पाळीव प्राणी पाळणे हे खूप सामान्य मानले जाते, पण जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. मालकांनी आपल्या पाळीव प्राण्याचे वर्तन समजून घेतले पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी इतर कोणालाही अस्वस्थता किंवा भीतीचा सामना करावा लागणार नाही याची खात्री केली पाहिजे. मुंबईतील या लिफ्टच्या घटनेने सोसायटीतील रहिवाशांची सुरक्षितता आणि पाळीव प्राण्यांचे स्वातंत्र्य यांच्यात योग्य संतुलन कसे साधावे, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *