गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी रान उठविणाऱ्या हार्दिक पटेल यांनी पोलीसांच्या भितीनं भर सभेतून पळ काढल्याची घटना घडली आहे.
पटेल आरक्षण आंदोलनात गुजरातच्या वेगवेगळ्या भागात जे लोक मृत्यूमुखी पडले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हार्दिक पटेलांनी अरवल्ली जिल्ह्यातल्या तैनापूर गावात सभेचं आयोजन केलं होतं. मात्र, या सभेपूर्वी त्यांनी स्थानिक प्रशासनाची कोणतीच परवानगी घेतली नव्हती. यामुळं कार्यक्रम सुरु झाल्यानंतर हार्दिकला अटक करण्यासाठी पोलीस तिथं पोहचले.
पोलीस पोहचल्याचं पाहताच हार्दिकनं भर सभेतून पळ काढला. पोलीसांनी हार्दीकच्या १३ सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेनंतर हार्दिक पटेल फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीही केली आहे.

