कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातला आरोपी समीर गायकवाडच्या आवाजाचे नमूने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासले जाणार आहेत. त्यासाठी गुजरात फॉरेन्सिक लॅबची एक टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे.
समीर गायकवाडला ताब्यात घेतल्यानंतर दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच उद्देशातून आणि एकाच गटानं केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे समीरनं काही दिवसांपूर्वी आपल्या मैत्रिणीशी केलेलं संभाषणाचं रेकॉर्डिंगही तपासण्यात येणार आहे. ज्यातून दाभोलकर, कलबुर्गी यांच्याही हत्येसंदर्भात काही धागेदोरे मिळतात का याची तपासणी होणार आहे.
मडगाव स्फोट, दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या या चारही प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा कसून प्रयत्न करीत आहेत. तसेच या प्रकरणी कर्नाटकातून दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचे सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

