यंदा मान्सूनने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असतानाच परतीच्या प्रवासात हवामान खात्याच्या अंदाजाने धास्तावलेल्या शेतकरीराजाला शुक्रवारी सुखद धक्का दिला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे राज्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. पुणे-मुंबईसह अन्य मोठय़ा शहरांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दिवसभर दमदार पाऊस होता. तर पुणे शहर आणि धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याने पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे. गणरायाच्या आगमनाबरोबर आलेल्या या पावसाने किमान पिण्याच्या पाण्याची चिंता तरी मिटावी, अशी मागणी नागरिक गणरायाकडे करत आहेत.
पाटबंधारे विभागाच्या वतीने दररोज सकाळी सहा वाजता धरणांचा आढावा घेतला जातो. यावेळी या धरण परिसरात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परंतु त्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला येथे सकाळी ९ वाजेपर्यंत २०, पानशेत येथे ४४, वरसगाव येथे ३७, टेमघर येथे २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दुपारी बारा वाजता खडकवासला येथे ४१, पानशेत येथे ६६, वरसगाव येथे ६४, टेमघर येथे ३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुपारनंतरही शहर व जिल्हा परिसरात पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे पावसाने गेल्या महिन्यात लावलेली ओढ आता संपली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वानाच भरपूर पावसाची अपेक्षा आहे.
लोणावळा शहर व ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाला. पावसाचा वेग प्रचंड असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. लोणावळा परिसरात गुरुवारी रात्रीपासूनच पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली होती.
पहाटे सहानंतर पावसाचा वेग प्रचंड वाढला असून जोरदार सरींनी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जुलै महिन्यात पडावा अशा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने अवघ्या दोन तासांतच सर्वत्र ओढे-नाले भरून वाहू लागले. रस्त्यांवर तसेच सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले.
द्रुतगती महामार्गाला नदीचे स्वरूप
धुवाधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोटच्या लोट आले होते. रस्त्यावर साचलेले पाणी पाहून रस्ता आहे की नदी हा प्रश्न अनेकांना पडला. यामुळे वाहतूक कोंडीही मोठी झाली होती. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्गावर हीच परिस्थिती होती.
द्रुतगती मार्गावरील कामशेत उस्रे टोलनाक्याजवळील रस्त्यावरून पाणीच पाणी वाहिल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. तसेच कान्हे येथील ओढय़ालाही पूर आला. त्यामुळे जुन्या महामार्गावरही पाणीच पाणी झाले. या साचलेल्या पाण्यामुळे तळेगाव ते लोणावळ्यादरम्यानच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे पाणी साचल्याने वाहने हळू चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

