आज गौराईसोबत 5 दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप…

आज गौराईसोबत 5 दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप…

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे आज विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी येथील जलाशय, समुद्रकिनारे, तसेच तलावाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यावेळी निर्माण होणारे निर्माल्य पाण्यात न टाकता ते निर्माल्यकलशात गोळा करण्याचे आवाहन पर्यावरण संस्था व पालिकेने केले आहे. पाच दिवसांच्या गणेशविसर्जनासाठी तीनही जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. आवश्यक सूचना व माहिती दर्शन भागावर फलकांवर लावण्यात आली आहे. या बाबत पोलिसांनी व महापालिकेने केलेल्या सूचनांच्या काटेकोर पालन करण्याचे आवाहन दोन्ही यंत्रणांनी केले आहे. गणेश घाट व समुद्रकिनारी सुरक्षापथकेही तैनात करण्यात आली आहेत.

मोठय़ा  उत्साहात आणि आनंदात ज्या गणरायांचे आगमन झाले त्या विघ्नहर्ता गणरायांना पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर आज निरोप देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात ५३ हजार ६०१ गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. काही ठिकाणी गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात येते. यंदा गौरींचे देखील पाचव्या दिवशीच विसर्जन होणार आहे. पाच दिवसांच्या गणरायांच्या विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१७ सप्टेंबरला गणरायांचे आगमन झाले. १८ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. २१ सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात येणार आहे.

१९ सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन झाले. आज गौरी-गणपतींचे देखील विसर्जन करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात ९० सार्वजनिक व ५३ हजार ५११ घरगुती गणपती व १७ हजार ४४ गौरींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *