टाईपराईटरवरच आपली उपजिवीका चालवणाऱ्या लखनऊच्या कृष्ण कुमार यांचा टाईपराईटर हजरतगंज पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रदीप कुमार यांनी लाथ मारून तोडला. त्याचेच फोटो आणि बातमी इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर या प्रकरणाची दखल खुद्द यूपीच्या मुख्यमंत्र्यांनाही घ्यावी लागली.
यूपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कुमारचं त्वरित निलंबिन केलं. तसंच कृष्ण कुमार यांना 2 टाईपराईटर नुकसान भरपाई म्हणून दिले. मात्र स्वाभिमानी वृत्तीच्या कृष्ण कुमार यांनी त्यातील एकच टाईपराईटर स्वीकारला. आजच्या संगणकाच्या युगात कृष्ण कुमार यांना मोठ्या मेहनतीनंतर 100 ते 150 रुपये मिळतात.
टाईपराईटर विकत घेण्यासाठीही त्यांना कर्ज घ्यावं लागलं होतं. यूपीत पोलिसांच्या अत्याचाराच्या घटना नव्या नाहीत. मात्र इंटरनेटवर व्हायरल झालेल्या बातमीनं कृष्णकुमार यांना दिलासा मिळाला आहे तर गोरगरिबांवर अत्याचार करणाऱ्या पोलिसाला जन्माची अद्दल घडली आहे.

