विघ्नहर्ता असलेला गणराय येताना आपल्या सोबत पाऊस घेऊन आल्यामुळे दुष्काळामध्ये होरपळणा-या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. शेवटच्या टप्प्यात असलेल्या मान्सूनच्या पावसामुळे चांगले पीक येण्याची शक्यता कमी असली तरी, निदान पिण्याच्या पाण्याची समस्या मोठया प्रमाणात दूर होऊ शकते.
मराठवाडा
गुरुवारपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयात धुवाधार पाऊस कोसळत आहे. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाडयात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय. दुष्काळी मराठवाडयातील बीड, जालना, नांदेड, औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होईल.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रालाही पावसाने दिलासा दिला आहे. नाशिकमध्ये आज तिसरे शाही स्नान असून, मध्यरात्रीपासूनच नाशिकमध्ये धुवाधार पाऊस कोसळत आहे. धुळे, नंदुरबार, अहमदनगरमध्ये वादळी वा-यासह पाऊस कोसळत आहे. या भागामध्येही अपु-या पावसामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती.
विदर्भ
महिन्याभरापासून गायब असणा-या विदर्भातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. चंद्रपूरातील इराई धरण पूर्ण भरल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुलढाण्याला पाणीपूरवठा करणारे येळगाव धरणही भरल आहे. वादळी वा-यासह कोसळणा-या मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील धोरखेडा गावात मोठ नुकसान झाल आहे. या गावात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये पाचजण जखमी झाले आहेत.
पुणे
पावसाने ओढ दिलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरु आहे. अपु-या पावासमुळे एक दिवसा आड पाणी पुरवठा सुरु असलेल्या पुण्यावर वरुण राजाने कृपादृष्टी केली असून, पुण्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

