लाडक्या बाप्पाचे उत्साहात आगमन

लाडक्या बाप्पाचे उत्साहात आगमन

सुखकर्ता, विघ्नहर्त्यां श्री गणरायांचे आगमन गुरुवारी घराघरांत होत आहे. कलेचा सागर आणि विद्याधिपती श्री गणेशाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. बाप्पांच्या आगमनाची लगबग प्रत्येक घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सुरू असून ढोल-ताशांच्या गजरात, डीजेच्या ढणढणाटात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘श्री’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना घराघरांमध्ये केली. त्यामुळे येते ११ दिवस अवघी मुंबई मंगलमय आणि भक्तिमय होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक घराघरामध्ये तसेच सार्वजनिक मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. बाप्पांना आवडणा-या लाडू, मोदकाच्या नैवेद्यांचा पाहुणचार घेत बाप्पांचे वास्तव्य राहणार आहे. त्यामुळे घराघरात, चाळींमध्ये आणि मंडपांमध्ये आरती आणि भजनांचे आवाज घुमणार असून मुंबापुरी भक्तीच्या सागरात न्हाऊन निघणार आहे.

गणेशोत्सवात सजावटीचे सामान, फुले, फळे तसेच अन्य वस्तूंच्या विक्रीचा बाजार फुलला आहे.

आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणा-या वस्तूंच्या खरेदीसाठी भक्तांचीही गर्दी उसळली आहे. दादर, बोरिवली, कुर्ला, घाटकोपर, विलेपार्ले, गोरेगाव, भांडुप, ग्रॅन्टरोड, लालबाग आदी ठिकाणी खरेदासाठी भक्तांनी तुफान गर्दी केली आहे.

जास्वंद ५ रुपये, चाफा आठ रुपये

गणरायांना लाल जास्वंदीचे फुल अतिप्रिय आहे. जास्वंदाच्या एका फुलासाठी ५ रुपये मोजावे लागत होते. तर सुवासिक असलेल्या चाफ्याच्या तीन फुलांसाठी २० रुपये मोजावे लागत होते. पुजेला लागणारी सुपारीही २० रुपयांना दादरमध्ये विकली जात होती. तर फुलांचे हारही ५० रुपयांपासून अधिक दरात विकले जात होते.

मिठाईच्या दुकांनामध्ये गर्दी

बाप्पांचे आगमन घरी होत असल्यामुळे श्रीच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी घरम्ी येणारे पाहूणे सगे-सोयरे, मित्रपरिवार आदींचाही पाहूणचार करण्यासाठी लाडू, चिवडाच्या खरेदीसाठी मिठाईच्या दुकानावर गर्दी उसळली होती. दादरच्या लाडू सम्राट दुकानाच्या बाहेर खरेदीसाठी रांग लागली होती. बाप्पांसाठी मोदक, खरेदी करण्यासाठी सर्वच मिठाईच्या दुकांनावर गर्दी दिसून येत होती.

लोकल खोळब्यांमुळे भक्तांच्या आनंदावर विरजण

मुंबईबाहेर राहायला गेलेला माणूस दादर, लालबागमध्ये खरेदी करत नाही तोपर्यंत त्यांना चैन पडणार नाही. दादर तिंवा लालबागमध्ये जावून खरेदी करण्याच्या भक्तांच्या इच्छेवर लोकल खोळंब्यामुळे विरजण घातले आहे. अंधेरी-विलेपार्ले दरम्यान रुळावरून घसरलेल्या लोकलमुळे विरार, नालासोपारा, वसई, भाईंदर, बोरीवलीमध्ये राहणा-यांनी दादरमध्ये न जाता स्थानिक ठिकाणीच विविध वस्तूंची खरेदी केली.

गणपतीची पूजा चार वाजेपर्यंत करा

गणपतीची पूजा ही दुपारी करावी असे शास्त्रात सांगितले आहे. तरीही ते शक्य नसल्यास सूर्योदयापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत पूजा करण्यास हरकत नाही. राज्यात दुष्काळ पडल्याने गणेशोत्सवावरील खर्च कमी करून शेतक-यांना मदत केल्यास गणपती पूजनाचे पुण्य मिळेल.

पुढील वर्षी बाप्पा ५ सप्टेंबरला

पुढील वर्षी बाप्पाचं आगमन सोमवार दि. ५ सप्टेंबर २०१६ रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *